॥श्री सद्गुरुलीलामृत॥
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मानवावर अत्याचार होउ लागले की देव अर्थात विष्णू कोणत्या ना कोणत्या स्वरुपात अवतार घेतात. मानवाला सन्मार्गाने चालण्याचा मार्ग दाखवतात. या अवतारांमध्ये फक्त विष्णूचे दहा अवतार एवढाच अर्थ अभिप्रेत नसून दत्त अवतार, मारुती अवतार, श्री देवी अवतार असे कितीतरी अवतार आपल्याला ऐकावयास मिळतात.
अशाच प्रकारची एक थोर विभुती अर्थात ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज होउन गेले. अर्थात होउन गेले असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण भक्ताच्या कल्याणासाठी ते अविरतपणे वास करताना आढळतात. आता वळूया महाराजांच्या अवतार कार्याकडे...
विठ्ठलभक्तीत प्रकटली रामभक्ती
माण तालुक्यातील गोंदवले या गावी कुलकर्णी नावाचे यजुर्वेदी ब्राह्मण कुटुंब वास्तव्यास होते. या घराण्यात परंपरेनुसार विठ्ठलभक्ती सुरु होती. पंढरपूरची वारी कधीही चुकत नसे. त्याचप्रमाणे घरात नेहमी भजन, किर्तन, प्रवचन या स्वरुपात हरिनाम घेतले जात असे. याच घराण्यात लिंगोपंत नामक एक सत्पुरुष होउन गेला. विठ्ठलावर त्यांची अपरिमित भक्ती आणि श्रद्धा होती. त्यांच्या पत्नी सौ. राधाबाई याही लिंगोपंत यांच्याप्रमाणेच विठ्ठलभक्त आणि पतीव्रता होत्या. या दोघांना पुत्ररत्न झाल्यानंतर त्याचे नाव रावजी असे ठेवण्यात आले. वयोमानानुसार त्यांना पंढरपुरला जाणे कठीण होत असले तरीही त्यांच्या वारीत कधीही खंड पडला नाही. या भक्तीवर प्रसन्न होउन साक्षात विठ्ठलाने दर्शन देउन तू यापुढे पंढरपूर येथे येउ नकोस असे सांगीतले. आपल्या गावीच विठ्ठलाचे मंदिर बांधण्यास सांगीतले. त्यासाठी विठ्ठलमुर्ती कोठे मिळतील याचाही साक्षात्कार झाला. त्याप्रमाणे विठ्ठलाची सेवा सुरु होती.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
या उक्तीनुसार रावजी यांचा विवाह कलेढोण येथील इनामदार यांची कन्या गीताबाई यांच्याशी झाला. गीताबाई यांनाही फक्त हरिनामाची ओढ होती. असे नाही तर त्यांना संसार, आलेले गेलेले या सर्वांचे खुप आनंदाने त्या करत असत. एके दिवशी साक्षात विठ्ठलाने रावजींना स्वप्नात येउन आपल्या पोटी पुत्ररत्न येणार असून जगद्वंद्य अशी त्याची ख्याती होणार असल्याचे सांगीतले. यथावकाश गीताबाई गरोदर राहिल्या. गीताबाईंना लागलेले डोहाळेसुद्धा फक्त हरिनाम, रामनाम घ्यावे. एकांतात बसावे. अशा पद्धतीचे होते. गीताबार्ईंना मुलगा झाला. अत्यंत सुंदर, गोंडस अशा बाळाने रावजी आणि गीताबाई यांच्या पोटी जन्म घेतला. बाळाचे नाव गणेश असे ठेवण्यात आले. बाळ गणेशाच्या बाळलीला पहाण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतून जनसमुदाय येउ लागला. म्हणतात ना! शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीनुसार गणेशाचे वागणे होते.
अगाध बाळलीला
लहानपणापासूनच गणेशाला भजन, किर्तन, प्रवचन यांची आवड होती. त्याच्या बाळलीला पहाताना लिंगोपंताना अर्थात आजोबांना खुप कौतुक वाटत असे. एकदा सहज गणेशाला आजोबांनी विचारले, बाळा! तुला जर हंडा भरुन मोहरा दिल्या तर तू काय करशील? क्षणाचाही विलंब न करता गणेश म्हणाला, अंध, अपंग, गरीब, गरजू, दीन, दलित यांना वाटून टाकेन. या उत्तराने आजोबांनी मोठेपणी हा खुप मोठा होणार असल्याचे जाणले होते. गणेशाला भजन, किर्तन, प्रवचन यांचे वेड होते याचा अर्थ असा नाही की तो अभ्यासात कुठे कमी होता. एकदा आजोबांनी भगवद्गीतेतील एक श्लोक म्हणून दाखवला. त्यानंतर गणेशाला म्हणावयास सांगताच त्याने तो श्लोक अर्थासह आजोबांना म्हणून दाखवला. गावातील मित्रांना जमवून दगडाचे राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान तयार करुन भजन, किर्तनात रंगून जात असे, त्यावेळी त्यांचे वय अवघे सहा-सात वर्षांचे होते. याच वयात एक दिवस मध्यरात्री स्मशानात जाउन नामस्मरण करत बसले. घरी आल्यानंतर रावजींनी अर्थात वडीलांनी त्याला विचारले स्मशानात तुला भीती नाही का वाटली? त्यावेळी सात वर्षांचे बालक म्हणाल, राम असताना कशाला भ्यायचे? जन्माला आलोय म्हणजे एक दिवस मरण असणारच. या उत्तराने वडीलही खजिल झाले. योग्य वयात रावजी आणि गीताबार्ईंनी त्यांचा व्रतबंध करवून घेतला. ज्यावेळी त्यांनी गायत्री मंत्राचा उपदेश ऐकला. तेव्हापासून गुरुविण न लगे मन या हट्टाने त्यांचे मन कशात रमत नव्हते. मग वडीलधार्यांची समजूत लग्न झाले की आपोआप प्रपंचात मन रमेल या अट्टाहासाने खातवळ येथील गोडसे यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. परंतु गुरुभेटीची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. मग गुरुभेटीसाठी प्रयाण करण्याचे ठरवले. वय अवघे बारा वर्षांचे होते.
गुरुभेटीची ओढ
सध्याच्या कालखंडाचा अभ्यास करावयाचा झाल्यास ब्राह्मण कुटुंबात जन्माला आल्यानंतर प्रत्येक मुलाला किंवा मुलीला शिक्षण अपरिहार्य मानले गेले आहे. किंबहूना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे म्हणावे लागेल. शिक्षणासाठी बाहेरगावी राहणं काही गैर मानले जात नाही. याउलट विविध प्रकारची डोनेशन भरुन जवळपास प्रत्येक पालक आपल्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील असतो, हे आपण सर्रास पाहतो. नव्हे या मुलामुलींना आपल्यापासून लांब रहावे लागणार असल्याबद्दल मनातून कितीही दु:ख झाले तरी मुलांच्या भविष्याचा विचार करुन त्यांना शहराच्या किंवा पाश्चिमात्य देशात पाठवण्यात येते. परंतु महाराजांच्या बाबतीत उलटे घडले, असे म्हणावयास हरकत नाही. महाराज आपल्या गुरुभेटीसाठी आग्रही होते. ते स्वत: काशीपासून रामेश्वरपर्यंत अनेक वेळा प्रवास करुन अनेकांचे मार्गदर्शन घेउन आपल्याला गुरु कोठे भेटेल या प्रयत्नात होते. या प्रवासादरम्यान महाराजांना अनेक साधुसंत भेटले. यामध्ये स्वामी समर्थ, स्वामी रामकृष्ण परमहंस याशिवाय दत्त संप्रदायामधील अनेक जण भेटले. या सर्वांकडून त्यांना अनेक गोष्टी शिकावयास मिळाल्या.
गुरुभेटीचा आनंद
रामदासी परंपरेतील रामकृष्ण यांनी तुकामाईंना रामनामाचा प्रसार करण्यास सांगीतले होते. तुकामाईंचे गुरु उमरखेडचे चिन्मयानंद यांच्या सूचनेनुसार तुकामाईंनी रामनामाच्या प्रसाराची जबाबदारी महाराजांवर सोपवली. एके दिवशी काशी येथील एका सद्गृहस्थाने येहेळगाव येथील तुकामाई आपल्याला मार्ग दाखवतील, असे सांगीतल्यानंतर त्यांनी ताबडतोब येहेळगाव गाठले. तुकामाईंना पाहताक्षणी त्यांना परमानंद झाला. म्हणजेच सध्याच्या काळात आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही असाच आनंद झालेला आपण पाहतो. थोडक्यात काय, पुर्वीच्या काळी गुरु स्वत: शोधावा लागत असे. तर सध्याच्या काळात आपला मार्ग आपण शोधायचा त्यासाठी कोठे जायचे, कसे जायचे हे सर्व पालकांना संगणक अथवा मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून सहज शक्य होते.
ब्रह्मचैतन्य कसे झाले?
तुम्हाला वाटेल, हा काय प्रश्न गुरु भेटला, पुढे काय? असा कसा प्रश्न उपस्थित केला आहे. याचा अर्थ महाराजांना तुकामाईंचे दर्शन झाले. त्यांना परमानंद झाला. तुकामाईंनी ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र दिला. परंतु एवढ्याने गुरुभेट झाली असे नाही. गुरुच्या परीक्षेत उतरणे आवश्यक आहे. तुकामाईंनी महाराजांची अनेक प्रसंगातून सत्वपरीक्षा घेतली. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचप्रमाणे महाराजांचे ब्रह्मचैतन्य अशी पदवी तुकामाईंनी महाराजांना दिली. त्यानंतर तुकामाइर्ंंनी आपण आपल्या घरी जाउन रामनामाचा प्रसार करावयास सांगीतले. म्हणजे बघा हं! सध्याच्या काळातही विद्यार्थ्याला कोणत्या शाखेला प्रवेश मिळतोय आणि पदवी अथवा द्विपदवी मिळण्यासाठी किमान सहा ते सात वर्षांचा कालावधी जावा लागतो. या काळात विद्यार्थ्यांची परीक्षाच सुरु असते. फरक एवढाच आहे की, गुरुंकडून दीक्षा मिळण्यापासून गुरुच्या कसोटीला उतरेपर्यंत घरातील कोणाचाही त्यावेळी संपर्कही नव्हता. परंतु सध्या इंटरनेटमुळे जगाच्या पाठीवर मुले कोठेही गेली तरी पालकांशी क्षणार्धात त्यांचा संपर्क होउन खुशाली समजते.
गुरुआज्ञा प्रमाण मानून कार्य
ज्यावेळी गुरुंनी आज्ञा दिली, आपल्या घरी, गावी जाउन रामनामाचा जप करावा. त्याचवेळी महाराज पुन्हा गोंदवल्यास आले. आपल्या पत्नीला गुरुभेट घडवून आणली. आपल्याला अपत्य होणार नाही, हे ज्ञात असल्यामुळेच महाराजांनी गुरुंकडून मोक्षाचा मार्ग मागण्याची विनंती केली. अल्पावधीतच महाराजांच्या पत्नीचे निधन झाले. महाराजांकडून आईची अव्याहतपणे सेवा सुरु होती. ठिकठिकाणी मंदिरे बांधून अव्याहतपणे रामनामाचा जयघोष सुरु होता.
रावजींचे निधन अन महाराजांचे मुंडन
आपले भक्त इंदोर येथे असतानाच रावजींचे निधन झाले. त्यावेळी आईसाहेब तसेच गोंदवले येथील सर्वांना खुप वाईट वाटले. महाराज तेथे नसल्यामुळे द्वितीय पुत्राकडून विधी करवून घेतला.
परंतु महाराज अंतर्यामी असल्यामुळे महाराजांनी इंदोर हर्दा येथे आपले मुंडन करवून घेतले. इतरांनी असे का विचारताच वडील गेल्याची बातमीही त्यांनी सांगीतली. त्यानंतर दहाव्या दिवशी अचानक गोंदवले येथे आले. मुंडन केल्याचे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. परंतु त्यांनी सर्वांचे समाधान केले. अशा अनेक घटना महाराजांच्या आयुष्यात घडल्या आहेत.
आईसाहेबांच्या इच्छेचा सन्मान
यानंतर आईसाहेब महाराजांना म्हणाल्या, आपली कुलकर्णी पदाची धुरा आता तू सांभाळावी, यावर महाराजांनी होकार देउन धुरा स्वीकारली. महाराजांची काम करण्याची, हिशेब करण्याच्या पद्धतीने त्यांनी गावकर्यांची मने जिंकली. परंतु हे काम करण्यात त्यांना मुळीच रस नव्हता. अवघ्या तीन महिन्यात त्यांनी हे काम बंद करुन पुन्हा रामनामासाठी आपले आयुष्य वेचले. आईसाहेब म्हणाल्या गणू तू एकटं रहाणं मला पसंत नाही. तू दुसरा विवाह करावा, अशी माझी इच्छा आहे. यावर महत्प्रयासाने महाराजांनी होकार दिला. परंतु एक अट घातली. मुलगी मीच शोधणार. त्यावेळी आईसाहेब हो म्हणाल्या. त्यांनी आटपाटी येथील एका अंध मुलीशी विवाह केला. या प्रसंगी आईला तसेच पत्नीला दोघींना वाईट वाटू नये, यासाठी महाराजांनी आपल्या आईला आई, मी अशी पत्नी आणली आहे की ती तुझ्याकडे डोळे वर करुनही पाहणार नाही. अत्यंत खुबीने महाराजांनी आईला आणि पत्नीला समजावले होते. अर्थात अनेक प्रसंगामधून महाराजांची ही खुबी लक्षात येते. त्यानंतर काही दिवसात आईसाहेबांनी काशीयात्रेची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी महाराजांनी आपल्या पत्नीला माहेरी पाठवले. घरावर तुळशीपत्र ठेवले. कोणत्याही मोहपाशात न अडकता काशीयात्रा करावी या उद्देशाने आईसाहेबांना काशीयात्रा घडवून आणली. अयोध्या येथेच आईसाहेबांनी आपला देह ठेवला.
परमेशवराचे अनुसंधान
सध्याच्या काळातही परमेश्वर आहे. कोणती गोष्ट चांगली अथवा वाईट ठरवण्यासाठी आता परमेश्वराची गरज नाही. सध्या इंटरनेटच्या जमान्यात चांगले काय किंवा वाईट काय हे समजण्यासाठी फक्त एका क्लिकची गरज असल्याचे निष्पन्न झाले असतानाही कोठेतरी परमेश्वर आहे, हे मान्य करावेच लागते. जगात अशा कितीतरी घटना सभोवताली घडत असतात. यामागे काय असावे याचा विचार करताना अनेक जण आढळतात. प्रत्येकाला येणारे अनुभव वेगळे, त्यातून निघणारा अर्थही वेगळा!
शिष्यवर्ग जमवला
महाराजांनी अनेक शिष्य जमवले. अनेकांना रामनामाचा गुरुमंत्र दिला. कितीतरी व्रतबंध, कितीतरी विवाह महाराजांनी घडवून आणले. कोणाला रामनाम, कोणाला दासबोध, कोणाला शिवस्तुती, कोणाला शाळीग्राम पूजन, कोणाला विठ्ठलभक्ती. येन केन प्रकारे महाराजांनी अनेकांना रामनामात गुंतवले. अनेकांच्या अडचणी सोडवल्या. अनेकांचे संसार फुलवले. अनेकांची भुतबाधा घालवली. यादी करायची झाली तर विषय आणखी लांबेल.
मनुष्य जन्म म्हणजे विकारांनी जडलेले शरीर. सर्व विकारांवर जय मिळवण्यासाठी रामनाम घ्यावे, असे महाराजांनी वारंवार सांगीतले. जीवाला मरण असते, आत्म्याला नाही, हे महाराज पटवून देत असत. जीवन जगताना कसे वागावे याबाबत महाराजांनी त्या काळात केलेले विवेचन आजच्या काळातही लागू पडते. परंतु मनुष्यजन्म फार विचित्र आहे. सहजासहजी कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. परंतु खोट्या आणि अशाश्वत गोष्टींवर मात्र मनुष्याचा लगेच विश्वास बसतो.
महाराजांनी सांगीतलेल्या आणि आचरणात आणावयाच्या काही गोष्टी:
* अखंड नामस्मरण करावे.
* जनसामान्यांना आपलेसे करावे.
* स्वधर्माचे जतन करावे.
* रागावर नियंत्रण ठेवावे. प्रेमाने सर्व प्रश्न सोडवावेत. अंत:करण निर्मळ ठेवावे.
* सद्गुरुचरणी लीन व्हावे.
* परपीडा, परनिंदा, परद्रव्यव्यापार, परस्त्री अभिलाषा या गोष्टींना स्वप्नातही थारा देउ नये.
* अवगुणांचा त्याग करावा. स्वत:चे रुप स्वत: ओळखण्यास शिकावे.
या सर्व गोष्टी वरवर पहाता किती साध्या आणि सरळ आहेत. परंतु प्रत्येक गोष्ट आत्मसात करणे कठीण आहे परंतु अशक्य नाही, हे महाराजांनी पदोपदी दाखवून दिले आहे.
सद्गुरु कसा ओळखावा?
सद्गुरु कसा ओळखावा याचे महाराजांनी खुप साध्या आणि सरळ शब्दात विवेचन केले आहे. ते म्हणतात जो भोळ्याभाबड्यांना त्रास देतो, कपट स्वरुपात लुबाडतो, माताभगिनींना तुच्छ समजतो. गरीबांना कमी लेखतो, अशांना सद्गुरु म्हणू नये.
जो शिक्षित आहे, परंतु इतरांपेक्षा वेगळा आहे. ज्यांना राग व लोभ एकसारखेच असते. आपला शिष्य इतरांना शरण गेल्याचा राग येत नाही. अशी लक्षणे असणार्यांना सद्गुरु म्हणावे. गुरुआज्ञा मानून गुरुला अनन्यभावे शरण जावे, असेही महाराजांनी सांगीतले आहे. याबरोबरच जो आपल्या शिष्यांना विषयापासून दूर करु शकतो यालाच गुरु मानावे, असे महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवले. मग ते जिजीबाई असो, किंवा भूतबाधा झालेले असो. महाराजांनी आपल्या कौशल्याने विषयांपासून दूर करण्याचे काम केले. महाराजांनी शिकवलेल्या या गोष्टींवरुन आपण एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी ती म्हणजे त्या काळापासून आजच्या काळातही महाराजांनी आजूबाजूला घडणार्या प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पहायला सांगीतले आहे. आपण असे डोळसपणे पहाण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
प्राणीमात्रांवर भूतदया
पूर्वपुण्याईनुसार आपल्या आयुष्यातील घटना घडत असल्याचे महाराज वारंवार सांगतात. महाराजांच्या वागण्यातील आणखी एक बाब म्हणजे त्यांची प्राणीमात्रांवर असणारी भूतदया. यातूनच त्यांनी गाईचे महत्व जाणले होते. गाईचे महत्व विषद करताना महाराज सांगतात, गाईपासून निर्माण होणार्या प्रत्येक गोष्टीला आजच्या वैज्ञानिकदृष्ट्याही तितकेच महत्व असल्याचे आढळून येते. फक्त गाईचे दुधच नाही तर दुधाचे पदार्थांशिवाय शेण, गोमुत्र यासह गाईपासून होणारा बैलही आपल्याला किती मदत करतो, हे महाराजांनी विषद केले आहे.
अन्नदानाचे आणि नामस्मरणाचे महत्व
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अन्नदान. अन्नदानाचे महत्व महाराजांनी अगदी सोप्या शब्दात वर्णन केले आहे. मंदिरे बांधण्याचा उद्देश सांगताना महाराज म्हणतात, मंदिरात आल्यानंतर प्रत्येक माणूस प्रसन्न अंत:करणाने देवाला शरण जातो. तेथे नामस्मरण केले जाते. म्हणून मंदिरांचे महत्व अबाधित आहे.
महाराजांनी आपला देह ठेवला तेही त्यांना कितीतरी महिने अगोदरच समजले होते. गुरुपौर्णिमा, रामनवमी या कारणांसाठी महाराजांनी आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावून पुसटशी कल्पना दिली होती. अगदी आपल्या जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी कोठे आपला देह ठेवावा याविषयी कल्पना दिली होती. सर्वांना भजनामध्ये गुंतवून त्यांनी आपला प्राण रामामध्ये विलीन केला.
जिथे नाम तिथे माझा वास
सध्याच्या काळाचा विचार करावयाचा झाल्यास महाराज ज्याप्रमाणे गुरुच्या परीक्षेत यशस्वी झाले. तशी परीक्षा सध्या जर कोणी घेतली तर नको ती परीक्षा, नको ते गुरु असे म्हणून कधीच सोडून दिले असते. परंतु आपल्या महारजांनी आपल्यासारख्या असंख्य शिष्यांसाठी अत्यंत सोपा असा मार्ग निवडला. त्या मार्गावरुन जाण्याबाबत आपल्याला सांगीतले आहे. हा मार्ग म्हणजे फक्त नाम घ्या. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी म्हणजेच तुम्ही कोणतेही काम करत असताना फक्त नाम घेण्याची जबाबदारी महाराजांनी आपल्यावर सोपवली आहे. जिथे नाम तिथे माझा वास असे महाराजांनी अगदी बजावून सांगीतले आहे. नामावर असणारे महाराजांचे किती प्रेम होते, याचे आपण वर्णन शब्दातही करु शकणार नाही.
ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचे चरित्र किंवा त्यांच्या चरित्राशी निगडीत सध्याच्या काळातील घटना यांचा संदर्भ लावण्याइतकी नक्कीच मी मोठी नाही. परंतु महाराजांच्या कृपाशिर्वादाने मी छोटासा प्रयत्न केला आहे. हा लेख वाचून एखाद्याच्या मनात जरी रामनाम घेण्याची इच्छा झाली तर महाराजांची अशी सेवा करण्याचे सार्थक झाले, असे मी मानेन. महाराजांच्या श्री सद्गुरुलीलामृत या ग्रंथाच्या सततच्या वाचण्यामुळे काही घटना मला सध्याच्या कालखंडांशी कशा मिळत्याजुळत्या आहेत, हे जाणवले. त्यामुळे हा प्रयत्न केला आहे. अर्थात हे कामही महाराजांनी माझ्याकडून करवून घेतले असल्याची मला खात्री आहे.
धन्यवाद लेखिका :-
श्रीमती उमा रुद्रभटे
फलटण


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏