"आनंदाचा सागर नयनी पाहा रे गड्यांनो"श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर म...

*🪷!!श्रीराम समर्थ!!🪷* *🌹महासमाधी भाग:-५🌹* *शनिवार ता. २० डिसेंबर :-* श्रीमहाराजांचे चुलते संन्यासी होते. त्यांचें वृंदावन धाकट्या राममंदिरापाशीं आहे. शनिवारी त्यांची पुण्यतिथि होती म्हणून श्रीमहाराज वृंदावनाकडे आले होते. त्या दिवशीं जेवण दुपारीं जरा उशिरा झालें. जेवण झाल्यावर श्रीमहाराज बाहेर आंचवत होते. समोर त्यांचे सासरे उभे होते. त्यांच्याकडे पाहून ते म्हणाले, 'बापू! आकाशांतून कुऱ्हाड सुटली आहे. मग कसे काय?' हे ऐकून त्यांचें सासरे घाबरले पण बोलून गेले, 'महाराज! माझी मुलगी लहान आहे!' (त्यांचा भावार्थ असा की, माझी मुलगी इतक्या लवकर जाऊं नये.) यावर श्रीमहाराज चटकन् बोलले, 'बरें तर, राम तुमच्या मनाप्रमाणें करील!' रात्रीं श्रीमहाराज पुन्हां भजनास उभे राहिले. मंदिरांत खूप गर्दी झाली. सुरुवातीला ते मागें पुढें फिरत होते, पण नंतर कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहिले. पायांना रग लागली म्हणजे एक पाय उचलून धरावा व एकाच पायावर उभे रहावें, त्या पायाला कळ लागली म्हणजे तो उचलून दुसऱ्या पायावर उभें रहावें, याप्रमाणें त्यांनीं रात्रीं दीड वाजेपर्यंत भजन केलें. निरूपणामध्यें देहाचें अशाश्वतपण, भगवंताची निष्ठा, नामाचें महत्त्व, सगुणाचें प्रेम, संतांच्या संगतीचें श्रेष्ठपण, यांबद्दल पुन्हां पुन्हां त्यांनीं सांगितलें. *!!श्रीराम जयराम जयजय राम!!* *प पू सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज* *🪷!!श्रीराम समर्थ!!🪷* *🌹महासमाधी🌹* *भाग:-६* *रविवार ता. २१ डिसेंबर १९१३:* रविवारचा दिवस उजाडला. श्रीमहाराजांच्यासकट सर्व लोकांचे नित्याचे व्यवहार सुरू झाले. दहा वाजतां श्रीमहाराजांनीं आऊताईला बोलाविलें आणि सांगितले, 'आऊताई ! सगळ्यांना सांगा की, आतां भात गांवाला गेला! जी भाजीभाकरी मिळेल ती खाऊन आनंदानें नाम घ्यावें आणि काळ कंठावा.'हे सांगून ते खोलीमध्ये जाऊन जरा पडले. इतक्यांत बाहेर अंताजीपंत आणि काका फडके यांच्यांत कांहीं कुरबुर झाली. तेव्हां दोघांना खोलीमध्यें बोलावून भांडणाचें कारण विचारलें. काका म्हणाले, 'महाराज, हें पहा, आपण नसला म्हणजे हें असें होते!' त्यावर श्रीमहाराज गंमतीनें हंसून म्हणाले, 'काका, पण उद्या सकाळीं मी इथें कुठे आहे ? आपण रामाच्या घरीं आहोत, जें असेल तें गोड करून घ्यावें. जें असेल ते रामाचा प्रसाद समजून खावें, भांडणतंडण करूं नये.' संध्याकाळी पांच वाजतां श्रीमहाराज गोठ्यावर गेले. बापूसाहेब खरे यांची सून न्यूमोनियानें आजारी होती, तिला तेथेंच ठेवली होती. डॉ. जोशी तिची शुश्रूषा करीत होते. श्रीमहाराज तिला पाहण्यास गेले व 'बरें वाटेल, काळजी करूं नकोस.' असा तिला धीर देऊन आपण गायींच्याकडे आले. अभ्यंकर नांवाचे गृहस्थ गायींची व्यवस्था बघत असत. गोठ्यामध्यें गायी व त्यांची वासरें मिळून पाऊणशें जनावरें होती. त्या सर्वांना नीट पाहून श्रीमहाराज अभ्यंकरांच्या झोंपडीसमोर आले. तेथें गवत पडलें होतें तें साफ करण्यास त्यांनी सांगितलें, तेव्हां भवानराव चटकन् पुढें झाला. त्यानें ती जागा स्वच्छ केली, सारवून काढली. त्यावर रांगोळी घातली, खुर्ची ठेवली, आणि श्रीमहाराज तिच्यावर बसले. गवताच्या दोन गंजी घेतल्या होत्या, गवत तेथेंच पडून होतें. भवानरावाला हांक मारून ते म्हणाले, 'भवानराव आज तूं इथेच रहा 'हें इतकें गवत इथें पडलें आहे.' नंतर सहज बोलतां बोलतां ते म्हणाले,'ही जागा फार छान आहे. इथें कायमचें येऊन रहावें असे मला फार वाटते. हे बोलून आपल्या खडावा श्रीमहाराजांनी अभ्यंकरांपाशीं दिल्या आणि त्यांना म्हणाले, 'मी इथें रहायला येईन, तोपर्यंत या सांभाळून ठेवा.' श्रीमहाराजांना गायींचे फार प्रेम होतें हे सर्वांना ठाऊक होतें. कधीं कधीं गायींचा गोठा ते स्वतः साफ करीत. कधीं कधीं तेथेंच स्वयंपाक करवून जेवण करीत. म्हणून सर्वांचा समज असा झाला कीं ते लवकरच मंदिरांतून गोठ्यांत रहावयास येणार आहेत. अंधार पडण्याच्या सुमारास गार वारा सुटला म्हणून श्रीमहाराज मंदिरात परत आले. आप्पा जरंडीकर नांवाच्या माणसानें उपवास सुरू करून तीन दिवस झाले होते. त्याला बोलावून श्रीमहाराजांनीं विचारलें, 'आप्पा, अरे हें उपासाचें वेड काय सुरू केलें आहेस ? तूं उपास का करतो आहेस ?' आप्पा म्हणाला, 'महाराज, आपल्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून मी उपास करीत आहे.' यावर श्रीमहाराज बोलले, 'इतकेंच ना! उद्यां मला बरें वाटेल!' पण हे शब्द ते असे कांहीं बोलले की, आप्पाला त्यांचें म्हणणें खरेंच वाटलें. श्रीमहाराजांनी त्याला आग्रह कर करून जेवायला घातला. पुन्हा रात्रीं ते भजनाला उभे राहिले. नऊ वाजतांच सर्व मंदिर गच्च भरून गेलें. श्रीमहाराज आरंभी थोडें तरी मागें पुढें हालत होते, पण दहा वाजल्यानंतर एके ठिकाणीं उभे राहूनच त्यांचें सांगणें चाललें होतें. त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस होता. त्यांचें तें शेवटचे भजन व निरूपण होतें. म्हणून, त्यांना उभे राहण्याचे विलक्षण कष्ट होत असतांना देखील ते भजनांत फारच रंगून गेले होते. सर्व निर्वाणीचे अभंग त्यांनी सांगितलें. एक अभंग असा सांगितला शरण शरण रघुनाथा । भक्तपालन करीं आतां ॥ १ ॥ श्रीरामा निरोप द्यावा । देई अखंडित सेवा ॥ २ ॥ ब्रीद राखीं रघुराज । हेंचि सांगतसें गुज ॥ ३ ॥ दीनदासाची विनवणी । आज्ञा द्यावी चक्रपाणी ॥ ४ ॥ आपण जाणार हैं श्रीमहाराजांनीं लोकांना जवळ जवळ स्पष्टच सांगितलें. भगवंताच्या नामाला विसरूं नका हे सांगतांना ते म्हणाले, आजवरी तुम्हां सांगितली मात । नामाविण हित समजूं नका ॥ १ ॥ मानूं नका नाम साधन हैं लहान । तुम्हां माझी आण जीवेंभावें ॥ २ ॥ मानूं नका सार संसार असार । दृश्य जोजार मानूं नका ॥ ३ ॥ सोडूं नका नाम, धरूं नका काम । नाहीं नाहीं नेम आयुष्याचा ॥ ४ ॥ दीनदास म्हणे सांगतों तें ऐका | अभ्यास वैखरी सोडूं नका ॥ ५ ॥ श्रीमहाराजानी जन्मभर भगवंताच्या नामाचा अट्टाहास धरला. शेवटच्या दिवशींही भगवंताचे नामच त्यांनी लोकांना सांगितलें. नामाचे महत्त्व फारच मोठें आहे ही गोष्ट त्यांनी आपल्या जीवाची शपथ घेऊन मोठ्या कळकळीने सांगितली. श्रीमहाराजांच्या भाषेमध्ये त्या दिवशीं इतका रस ओसंडत होता कीं, ऐकणाऱ्या सर्व स्त्री-पुरुषांच्या डोळ्याना अश्रुधारा लागल्या होत्या. भजन होतां होतां रात्री एक वाजला. श्रीमहाराजांनी अभंग म्हटला. सरली आयुष्याची गणना । आतां येणे नाहीं पुन्हा ॥ १ ॥ पायी मन राही। हेंचि सुख आम्हां देई ॥ २ ॥ तुझ्या पायीं पडली मिठी । आतां जातों उठाउठी ॥ ३ ॥ दीनदास म्हणे रघुनाथा । आज्ञा द्यावी मज आतां ॥ ४ ॥ हा अभंग म्हणून श्रीमहाराजांनीं समोर उभ्या असलेल्या श्रीरामरायाकडे इतक्या प्रेमळपणाने पाहिलें कीं सगुण प्रेमाचा त्यांनीं कळसच केला. लगेच लोकांच्याकडे पाहून ते म्हणाले बाळ गोपाळ लहान थोर । भाऊबंद वतनदार ॥ १ ॥ नाहीं झालों द्रव्यवान । जन्म घेउनि झाला शीण ॥ २ ॥ काय दाखवूं वदन । रामार्पण केला प्राण ॥ ३ ॥ आतां नाहीं नाहीं धोका । राम नेईल परलोका ॥ ४ ॥ आज्ञा सकळ लोक । पायां पडतों मी रंक ॥ ५ ॥ आतां पुन्हा नये गांवा । दीनदासा कृपा ठेवा ॥ ६ ॥ श्रीमहाराजांच्या तोंडून हा अभंग ऐकल्यावर लोकांचा जीव नुसता पिळवटूननिघाला. त्यांना मोठ्यानें रडतां येईना व दुःख आंतमध्ये सामावेना, पण तेथून उठून बाहेरहि जाववेना. अखेर दीड वाजला तेव्हां श्रीमहाराजांनीं सर्वांना नमस्कार केला, सर्वांच्याकडे प्रेमाने भरलेल्या नजरेनें बघितलें, आणि अगदीं सावकाश पण गोड आवाजांत अखेरचा अभंग म्हटला:- भजनाचा शेवट आला । एकवेळ राम बोला ॥ १ ॥ आजि पुण्य पर्वकाळ । पुनः नाहीं ऐसी वेळ ॥ २ ॥ रामनाम वाचें बोला । आत्मसुखामाजीं डोला ॥ ३ ॥ दीनदास सांगे निका | रामनाम स्वामी शिक्का ॥ ४ ॥ गातां गातां त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला, त्या नामाच्या प्रेमाची त्या दिवशी त्यांनी पराकाष्ठा केली. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले; झालें! श्रीमहाराजांचे शेवटचे भजन संपले. ज् या भगवंताच्या नामाची थोरवी नामाच्या महत्त्वाचे जन्मभर त्यांनीं गायन केले; आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचें महत्त्व सांगण्यांतच त्यांनीं घालविले. श्रीमहाराजांनीं जन्मभर डोळ्यांनीं नाम पाहिलें, कानांनीं नाम ऐकलें, वाणीनें नाम घेतलें, मनानें नाम कल्पिलें, बुद्धीनें नाम चिंतिले. कायावाचामनानें जगांत एका नामाशिवाय त्यांनीं दुसरें कांहीं सत्य मानलेंच नाहीं. *!!श्रीराम जय राम जय जय राम!!* *प पू सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*

टिप्पण्या