❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
*🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹*
*🔸सुख.🔸*
*एका गावात एक ब्रम्हचारी गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात रहात असे. मारुतीची सेवा -उपासना करावी, नामस्मरण- भजन करावे आणि आनंदात दिवस घालवावेत... असा त्याचा दिनक्रम असे.*
*एकदा एक मोठा सावकार त्या देवळामध्ये उतरला. त्याची ती नोकर- चाकर माणसे व ऐश्वर्य पाहून ब्रम्हचाऱ्याला वाटले की, तो मोठा सुखी माणूस असावा; म्हणून त्याने सावकाराला तसे विचारले. तेव्हा सावकार म्हणाला, "अहो, मी कसला सुखी..., मला मुलबाळ नाही. अमक्या गावात एक श्रीमंत माणूस आहे. त्याला चार मूले आहेत, तो खरा सुखी...!"*
*तो ब्रम्हचारी बुवा त्या श्रीमंताकडे गेला, तेव्हा तो श्रीमंत त्याला म्हणाला, "अहो, मी कसला सुखी, माझी मुले माझ्या आज्ञेत नाहीत. त्यांना शिक्षण नाही. या जगात विद्येला खरा मान आहे. अमक्या गावात तो विद्वान आहे, तो खरा सुखी ...!"*
*ब्रम्हचारी बुवा त्या विद्वानाकडे गेला, तेव्हा तो म्हणाला, "अहो, मी विद्वान कसला सुखी, हाडाची काडे करून एवढी विद्या मी संपादन केली, पण त्या विद्येने मला धड पोटापुरतेही मिळत नाही. अमक्या गावात तो पुढारी आहे, तो खरा सुखी आहे...!"*
*ब्रम्हचारी बुवा त्या पुढाऱ्याकडे गेला, तेव्हा तो म्हणाला, "अहो, मी कसला सुखी, माझ्यापाशी पैसा आहे, विद्या आहे, कीर्ती आहे, मुलेबाळे आहेत; पण लोक माझ्या मागे माझी फार निंदा करतात, ती मला सहन होत नाही; अमक्या खेडेगावात मारुतीच्या देवळात भिक्षा मागणारा आणि भगवंताची उपासना करून राहणारा एक ब्रम्हचारी आहे, तो अगदी खरा सुखी आहे बघा....!"*
*हा माणूस आपलेच वर्णन करीत आहे, हे पाहून त्या ब्रम्हचारी बुवाला लाज वाटली, व तो आपल्या घरी परत आला. आपल्या जवळ जे नाही, ते इतरापाशी आहे, आणि तो खरा सुखी असला पाहिजे, असे आपण धरून चालतो; पण ते तसे नसते. खरे सुख हे बाह्य वस्तूवर अवलंबून नसते, तर ते आपल्या मानसिकतेवरच अवलंबून असते...!*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏