*नामाचा नैवेद्य -----*
*जेव्हां जेव्हां एखाद्या शुभ दिवशी आम्ही श्रीमहाराजांना नैवेद्य दाखवतो तेव्हां विनया म्हणते, " महाराजांना 'नामाचा नैवेद्य' दाखवायला हवा. "*
*' नामाचा नैवेद्य ' ही कल्पना ऐकायला छान वाटते पण प्रत्यक्षात नामाचा नैवेद्य दाखवणे म्हणजे काय करायचे ते समजत नव्हते.*
*-- आणि अचानक एक दिवस डोक्यात प्रकाश पडला. तुम्ही मला जेवायला बोलावले आणि श्रीखंडपुरीचा बेत केला तर मी अर्थातच श्रीखंड खाईन, पण मला फार आनंद होणार नाही कारण श्रीखंड मला फारसे आवडत नाही. पण तेच जर तुम्ही बासुंदी ठेवली तर ! अरेव्वा! मी अगदी आवडीने खाईन.*
*आता महाराजांना नैवेद्य दाखवताना आपण काय करतो ? आपण कधीही तिखट वस्तूचा नैवेद्य दाखवत नाही. पेढे, बर्फी, शीरा, पुरणपोळी वगैरे आपल्या सोईच्या व आपल्या आवडीच्या गोष्टींचा महाराजांना नैवेद्य दाखवतो. खरं तर महाराजांना आवडणार्या गोष्टीचा नैवेद्य त्यांना दाखवला तर त्यांना आनंद होईल ना. त्यांना आवडते एक भगवंताचे नाम. बरं, गोड पदार्थ दाखवायचा तर नाम गोड आहे का ? संतांनी म्हटलेच अाहे की ' नाम तुझे बहू गोड सखया, नाम तुझे बहू गोड ', किंवा ' अम्रुताहूनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा ' तेव्हां अम्रुताहून गोड असणार्या आणि महाराजांना आवडणार्या रामनामाचा नैवेद्य त्यांना दाखवला तर त्यांना नक्कीच आवडेल.*
*मग नैवेद्य दाखवायचा म्हणजे काय करायचे ? आपण नैवेद्य दाखवतो तेव्हां प्रसाद भगवंतापुढे ठेवतो, मनाने त्यांना ग्रहण करण्यास सांगतो आणि शेवटी आपणच आवडीने खातो. त्याप्रमाणेच नामाचा नैवेद्य दाखवायचा म्हणजे श्रीमहाराजांच्या तसबिरीपुढे आपली माळ ठेवून त्यांना नमस्कार करायचा आणि मग ती माळ घेऊन नामस्मरण करायचे. जर आवडीचा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून असेल तर आपण त्यावर तुटून पडतो, तर तसेच नामाचा नैवेद्य दाखवल्यावर अापण सपाटून नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य होणार नाही का ? श्रीराम .*
*---- डॉ. मनोहर वर्टीकर.*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏