बटाटा हे पीक प्रामुख्याने उत्तर भारतात थंड हवामानाच्या ठिकाणी घेतले जाते. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात लागवड केली जाते. खरीपातील उत्पादनाच्या मानाने रब्बी हंगामातील बटाटा उत्पादन अधिक येते. याचे प्रमुख कारण म्हणजे खरीप हंगामातील लागवड पावसावर अवलंबून असते. बहुतेक वेळा लागवड उशिरा होते. त्यामुळे उगवण कमी होते. रब्बी हंगामात मात्र बटाटा लागवड करून पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पिकाची जोमदार वाढ होते. तसेच थंडीमुळे पिकाची वाढ चांगली होते व उत्पादन अधिक येते. पावसाळी बटाट्याच्या तुलनेत रब्बी हंगामातील बटाटा निर्धोक असून त्यापासून अधिक उत्पादन हमखास मिळते.
म्हणूनच बटाट्याची लागवड कधी आणि कशी करण्यात येते हे महत्वाचे ठरते. बटाटा लागवडी संदर्भातील काही महत्वाच्या पैलूंवर प्रकाशझोत टाकूया.
जमिन
- बटाट्याचे पीक घेण्यासाठी मध्यम प्रतीची व उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन अधिक चांगली असते.
- बटाट्यासाठी चिकण वा पाणथळ जमिनीची निवड करू नये. कारण या जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असते.
- जर बटाटा लागवड केलेली जमीन पाणथळ असेल तर लागवड केलेला बटाटा किंवा बटाट्याचे बियाणे लागवडीनंतर ताबडतोब कुजणे किंवा सडण्याची शक्यता असते.
- याचा परिणाम उत्पादनावर होतो बटाट्याची उगवण अतिशय कमी होऊन, झाडांची हेक्टरी संख्या कमी मिळते, पर्यायाने उत्पादन घटते.
पूर्वमशागत
- खरिप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर जमिनीची उभी-आडवी नांगरणी करावी.
- यानंतर, काही दिवस जमीन उन्हात तापल्यानंतर कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन, ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी.
- शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर हेक्टरी २५ ते ३० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे किंवा खरिपातील हिरवळीचे खत म्हणून ताग किंवा धैंचा जमिनीत गाडणे, रब्बी बटाट्याचे अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने फारच फायद्याचे आढळले आले.
- सोयाबीन, मूग, उडीद किंवा बाजरी या पिकानंतर बटाट्याचे पीक घेतल्यास उत्पादन चांगले मिळून जमिनीचा पोत कायम टिकून राहतो.
बटाटा बेणे
- कोणतेही पीक घेताना बियाणाचा दर्जा अत्यंत महत्वाचा असतो. बटाटा बेणे हे कीड व रोगमुक्त असावे.
- बेणे बटाटे पूर्ण वाढलेले व त्यावर अंकुर फुगलेले, ठेंगणे, जाड व चांगले पोसलेले कोंब असावेत.
- लागवडीसाठी वापरावयाचे बटाटे बेणे हे २५ ते ३० ग्रॅम वजनाचे, पाच सें.मी. व्यासाचे, संपूर्ण (न कापलेले) साधारणतः अंड्याच्या आकाराचे असावे. बटाटे कापून फोडी करताना विळा व तेथील जागा जंतू विरहित करावी.
- त्यासाठी विळा/ चाकू मॅन्कोझेबच्या ०.२ टक्का द्रावणात बुडवून वापरावा.
- कापलेल्या फोडी कमीत कमी १० ते १२ तास सावलीत सुकवून घ्याव्यात व नंतरच लागवडीस वापराव्यात.
- एक हेक्टकरसाठी १५-२० क्विंटल बेणे लागते.
हवामान व हंगाम
- बटाटा हे पीक राज्यात रब्बी हंगामात अधिक उत्पादन देते असे संशोधनावरून दिसून आले आहे. पीक वाढीच्या काळात दिवसाचे सरासरी तापमान २१ अंश से.पेक्षा कमी असावे.
- बटाटा पोसण्यास २० अंश से. तापमान आदर्श असते. जमिनीत योग्य ओलावा व पोषक अन्नघटक असावे.
- जमिनीचे तापमान १७ ते २० अंश से. असल्यास बटाटे चांगले पोसतात. यापेक्षा जास्त तापमान पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम करते. त्यामुळे उत्पादन कमी मिळते.
- रब्बी हंगामात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान लागवड करावी. त्यामुळे डिसेंबर व जानेवारीच्या थंडीचा बटाटे पोसण्यास चांगला उपयोग होतो व अधिक उत्पादन मिळते.
- १५ नोव्हेंबर नंतर बटाटा लागवड केल्यास पीकवाढीच्या काळात तापमान वाढते व त्याचा उत्पादनावर विपरीत परिमाण होतो.
बटाट्याची लागवड कशी करावी?
बटाटा लागवडीसाठी फक्त प्रमाणित व निरोगी बियाणे वापरावे. खरीप हंगामातील बटाटा ताबडतोब रब्बी हंगामातील लागवडीसाठी वापरू नये, कारण जवळ जवळ तीन महिने बटाटा सुप्त अवस्थेत असतो. शीतगृहातून बटाटे बाहेर काढल्यानंतर त्याची लगेच लागवड न करता कमीत कमी ७ ते २० दिवस सावलीत विरळ पसरून ठेवावेत. या कालावधीत बटाट्यांना मोड येणे गरजेचे आहे. मोड न आलेले किंवा अधिक सुकलेले बटाटे लागवडीस वापरू नयेत.
खतांचे नियोजन कसे करावे?
उत्पादन कोणतेही असो खतांचा चपखल पण मर्यादित वापर होणे गरजेचे आहे. अधिक उत्पादन मिळण्यासाठी संतुलित खतांचा वापर करावा. खतांचा वापर करण्याआधी जमिनीचा पोत लक्षात घ्यावा. यासाठी मृदा परीक्षण केल्यास नक्किच फायदा होऊ शकतो. पिकास माती परीक्षणानुसार १५० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, १२० किलो पालाश प्रति हेक्टरी खतांची मात्रा द्यावी. यापैकी नत्राची १०० किलो मात्रा, संपूर्ण स्फुरद व पालाश लावणीच्या वेळी द्यावा व उरलेली नत्राची ५० किलो मात्रा पीक एक महिन्याचे झाल्यानंतर प्रति हेक्टरी द्यावी किंवा सुफला १५:१५:१५ द्वारे वरील खताची मात्रा द्यावयाची झाल्यास लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी सुफला (१५:१५:१५) च्या आठ बॅगा तसेच युरिया व म्युरेट ऑफ पोटॅशच्या दोन बॅगा द्याव्यात व लागवडीनंतर एक महिन्याने युरियाच्या दोन बॅगा द्याव्यात. खते दिल्यानंतर पिकास लगेच पाणी द्यावे. रासायनिक खते बटाट्यावर पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी अन्यथा बटाटे सडू शकतात. त्यासाठी रासायनिक खते जमिनीत पेरून दिल्यास फायदेशीर ठरते. आंतरमशागत कशी करावी ?
अशाप्रकारे आंतरमशागतीत खुरपणी, खांदणी किंवा वरंब्यास माती लावणे इत्यादींचा अंतर्भाव होतो. बटाटा सूर्यप्रकाशात आल्यास ताबडतोब हिरवा होतो. वरंब्यास भरपूर माती लावली असता बटाटे हिरवे होत नाहीत. लागवडीपासून एक महिन्याच्या आत तणनियंत्रणासाठी एक ते दोन खुरपण्या देऊन शेत स्वच्छ ठेवावे किंवा तणनियंत्रणासाठी तणनाशकाचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने वापर करावा.
पाणी व्यवस्थापन कसे करावे?
बटाट्याची एकूण पाण्याची गरज ५० ते ६० सेंमी आहे. खरीपातील बटाट्याला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. तर रब्बी हंगामातील लागवड जमीन ओलावून वाफश्यावर केली असल्यास पहिले पाणी १० ते १५ दिवसांनी द्यावे. रब्बी हंगामामध्ये ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. बटाट्याला एकूण ९ ते १० पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. बटाटे काढणीपूर्वी १० ते १२ दिवस पाणी तोडावे.
काढणी कशी करावी?
साधारणपणे बटाटे ९० ते १०० दिवसांत काढणीस तयार होतात. मात्र बटाटा काढणीचे एक तंत्र आहे. काढणीपूर्वी बटाट्याची झाडे जमिनीलगत कापून घ्यावीत आणि त्यानंतर ५ – ६ दिवसांनी बटाट्याची काढणी करावी. त्यामुळे बटाट्याची साल निघत नाही व वाहतुकीत बटाटा चांगला राहतो. बटाटा काढणीसाठी लाकडी नांगराचाही वापर करून मजुरांकडून तो वेचून घेतात. यानंतर, वेचलेले बटाटे स्वच्छ करून बाजारात विक्रीसाठी पाठवावेत. जर लगेचच बटाटे बाजारात पाठविणे शक्य नसेल तर बटाटे शितगृहात साठवावेत. काही शेतकरी, शितगृहाची सोय नसल्यास आरणीमध्ये देखील बटाट्याची साठवण करता येते.
चांगले उत्पादन कसे घ्यावे?
उत्तम नियोजन असेल तर कमी गुंतवणूक आणि कमी जागेतही बटाट्याचे पीक घेऊन चांगला फायदा मिळू शकतो. साधारणपणे एक एकरामध्ये एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. म्हणूनच, बटाट्याची शेती फायद्याची ठरू शकते.
उत्पादन घेतल्यानंतर प्रक्रिया उद्योग कोणते?
बटाट्याचे अधिक उत्पादन झाल्यास बटाट्यापासून निरनिराळे प्रक्रिया पदार्थ तयार करून विकणे फायद्याचे ठरते. बटाट्याचे वेफर्स. पापड, चिप्स, कीस, चिवडा, चकली, असे एकापेक्षा एक पदार्थ तयार केले जातात.
एकुणच काय बटाट्याचे अनेक पदार्थ बनविले जातात. आणि या पदार्थांना चांगली मागणी देखील आहे. म्हणूनच, बटाट्याचे उत्पादन निश्चितपणे फायद्याचे ठरू शकते.
सूचना: वरील लेखात दिलेल्या लागवड, मशागत, कीड व रोग नियंत्रण यासंबंधित पद्धती तुम्ही राहात असलेला विभाग, हवामान व मातीचा प्रकार यांनुसार बदलू शकतात. तुमच्या विभागाशी निगडित माहिती मिळवण्यासाठी नजीकच्या कृषी सेवा केंद्राशी संपर्क करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏